चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात आज चुरशीच्या निवडणुका झाल्या. मतदान आटोपताच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि अपक्ष मिळून १०७ उमेदवार रिंगणात होते. विजयाचे दावे सर्वांचेच असले तरी, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या जिल्हा प्रमुखांनी विजयाचा हमखास दावा केला आहे. काही जागांवर लढतीमध्ये आपला उमेदवार चांगली टक्कर देईल, अशी प्रांजळ कबुलीही काही जिल्हा अध्यक्षांनी दिली आहे.राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य म्हणाले, सहा पैकी चंद्रपूर, राजुरा आणि ब्रह्मपुरी या तीन ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार नक्कीच निवडून येतील. चंद्रपुरात भाजपा सोबत, राजुरात काँग्रेससोबत तर, ब्रह्मपुरीत भाजपासोबत आपली लढत असेल. वरोरा आणि चिमूर मतदार संघात आपल्या उमेदवाराची लढत लक्षवेधी असेल, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश देशमुख यांनीही वरोरा आणि चंद्रपूरच्या जागेवर विजयाचा दावा केला आहे. चंद्रपुरात आपल्या उमेदवाराची टक्कर भाजपाशी असेल, तर वरोऱ्यात काँग्रेससोबत असेल. ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार चांगली मते घेईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार म्हणाले, वरोरा येथे आपला उमेदवार विजयी होईल. तिथे काँग्रेसोबत लढत होईल. अन्य पाच ठिकाणी उमेदवार चांगली लढत देतील. पक्षासाठी ही पहिलीच संधी असल्याने पक्ष संघटन मजबूत झाले. आमचा लढा सर्वच पक्षातील प्रस्थापितांशी होता. तरीही आम्ही लढू शकलो, याचा कार्यकर्त्यांना आनंद आहे. अन्य जिल्हाध्यक्षांच्याही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून विजयाचा दावा
By admin | Updated: October 15, 2014 23:31 IST