रवी जवळे - चंद्रपूरसावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत. या सावित्रीच्या लेकींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने ‘लेक शिकवा’ अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शिक्षण विभागाने आणली आहे. आता हे अभियान आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाने आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला दहा शाळाबाह्य मुलींचे पालकत्व मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्वातंत्रपूर्व काळात मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने बघितले जात नव्हते. जणू ‘चूल आणि मूल’ यासाठीच मुलींचा जन्म असावा, अशी प्रथाच रुढ झाली होती. त्यामुळे मुलींना शिकविण्याकडे पालकांचा कल दिसून येत नव्हता. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळच हाती घेतली. प्रारंभी या चळवळीला काही समाजकंटकांनी विरोध केला. मात्र पुढे ही चळवळ यशस्वी झाली आणि मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही काम करीत आहेत. महिलांनी शिक्षणात प्रगती केली, हे सर्वमान्य असले तरी अनेक मुली आताही शाळाबाह्य जीवन जगत आहेत, हेदेखील मान्य करावे लागेल. शिक्षण विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात अजूनही ५३ हजार मुली शाळाबाह्य आहेत. प्रत्यक्षात हा आकडा लाखोत असावा. त्यामुळे या शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन व शालेय शिक्षण विभाग जोरदार प्रयत्न करीत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून विविध घटकातील शाळाबाह्य मुुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. या अभियानाला यशही लाभत असून आतापर्यंत नियमित गैरहजर असलेल्या राज्यभरातील ६५ हजार मुली दररोज शाळेत येऊ लागल्या आहेत. असे असतानाही अद्याप राज्यातील ५३ हजार मुली शाळाबाह्यच आहेत. त्यामुळे या अभियानात आणखी सकारात्मक बदल करून घेत शालेय शिक्षण विभागाने आता ‘शैक्षणिक पालक’ ही योजना पुढे आणली आहे. अजूनही शाळाबाह्य असलेल्या या सावित्रीच्या लेकींना शाळेत आणण्यासाठी त्यांना पालक मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने आपल्याच अधिकाऱ्यांना सोपविली आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख या दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा मुलींचे पालकत्व मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात सतत अनुपस्थित असलेल्या व शाळा सोडून गेलेल्या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे.
शाळाबाह्य मुलींना मिळणार पालक
By admin | Updated: February 7, 2015 23:20 IST