घनश्याम नवघडे
नागभीड : तालुक्यात कोरोना संशयितांचे निदान करण्यासाठी ऑक्सिजन लेवल तपासणीची मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ८१७ व्यक्तींची ही तपासणी करण्यात आली आहे. मात्र या तपासणी मोहिमेत आशा सेविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे.
नागभीड तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू असून, ३ मेपर्यंत दोन हजार २८० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर काही व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. या आजाराच्या निर्मूलनासाठी व निदानासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विविध सर्वेक्षणही करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच ही ऑक्सिजन लेव्हल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३४ हजार ५४५ आहे. यातील एक लाख १४ हजार ८१७ व्यक्तींची ऑक्सिजन लेवल तपासणी पूर्ण झाली आहे. तपासी झालेल्या व्यक्ती ३२ हजार ८१७ घरांपैकी २५ हजार ४९७ घरांमधील आहेत. आशा सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ही तपासणी करण्यात आली. ही मोहीम सुरूच असून, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे या तपासणीवर लक्ष आहे. या तपासणीत १८ व्यक्ती ऑक्सिजन लेव्हल ९० पेक्षा कमी, तर ४६ व्यक्ती ९५ पेक्षा कमी ऑक्सिजन असल्याचे समोर आले. या ६४ व्यक्तींना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
दरम्यान, या तपासणी मोहिमेत आघाडीवर असलेल्या आशा सेविकांना ही तपासणी करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिक एकतर ही तपासणी करण्यास उत्सुक नाहीत. एखाद्या घरी आशा सेविका तपासणीसाठी गेल्या की, तुम्ही दिवसभर घरोघरी फिरता, तुमच्यामुळेच कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. आम्ही तपासणी केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आणता. तुम्हाला पैसे मिळतात. असे उपरोधिक बोलणे ऐकावे लागत असल्याचे आशा सेविकांनी सांगितले.
बॉक्स
सर्दी, ताप, खोकल्याचे ३७६ रुग्ण
आशा सेविकांद्वारे सुरू असलेल्या या तपासणीत कुटुंबातील सर्वच व्यक्तींचे ऑक्सिजन, तापमान तपासणी केली जात आहे. तसेच त्यांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असल्याबाबतची माहिती जाणून घेतली जात आहे. आतापर्यंत या मोहिमेत ३७६ व्यक्ती सर्दी, ताप व खोकल्याने ग्रस्त असल्याचे समोर आले असल्याची माहिती आहे.