: स्थानिक माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे कोविड नियमांचे पालन करून येथील स्वागत सेलिब्रेशन हॉलमध्ये प्रथमच ऑनलाईन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे, हे वर्ष रौप्यमहोत्सवी असतानासुद्धा साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
माना जमातीचे आराध्यदैवत माणिकादेवीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन नत्थू दांडेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मंडळाचे कार्याध्यक्ष शंकर गरमडे होते तर प्रमुख अतिथी सुनील गजबे, वेंकटेश घरत, संजय जांभूळे, संजीव शेरकर, बंडू हनवते, मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वधू-वरांची माहिती असलेल्या एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थी स्थिती भरडे, वैभवी चौधरी, आकाश रंद्ये,काजल दडमल, रोहित चौधरी सुरज श्रीरामे तर दहावीतील सानिका वाकडे, सुधांशू गजबे, नेहा श्रीरामे, शैला ढोक, खुशी रणदिवे, प्रांजली दामोदर डोहतरे, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू प्रियंका पांडुरंग गायकवाड यांचा रोख रक्कम स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शेकडो वधू-वरांनी नावनोंदणी करून परिचय दिला.
विदेशात असलेल्या जमात बांधवांनीसुद्धा सहभाग दर्शविला.
हजारो समाजबांधवांनी घरी बसूनच कार्यक्रमात हजेरी लावली. प्रास्ताविक व अहवाल वाचन देवीदास जांभुळे यांनी केले. सूत्रसंचालन दामोदर दोहतरे यांनी तर नंदू दडमल यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रूपचंद धारणे, पुरुषोत्तम घोडमारे, देवराव घरत, अमोल हनवते, श्रीकांत वाकडे, किशोर चिकटे, राजू चौधरी, देवानंद श्रीरामे, सतीश ननावरे, मनीष ननावरे आदींनी सहकार्य केले.