मूल : मूल नगर परिषदेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेसने उमेदवारांची चाचपणीदेखील सुरू केली आहे. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवक व नव्याने बांशिग बांधू पाहणाऱ्यांनी पक्षाची तिकीट मिळावी, यासाठी प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव लक्षात घेता, भाजपा सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येते. विद्यमान काही पदाधिकाऱ्यांना भाजपा डच्चू देणार असुन काँग्रेसने देखील उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे दिसून येते. एकंदरीत मूल नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्याचे दिसुन येते.मूल नगर परिषदेवर भाजपाची सत्ता असुन भाजपाचे १३ नगरसेवक आहेत. भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानोसुद्धा एखादा लोकोपयोगी ठराव करायला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानासुद्धा ठराव नामंजुर होण्याची पाळी देखील बहुतेकवेळा आल्याचे दिसुन येते. त्यामुळे स्पष्ट बहुमत असताना देखील ठराव मंजूर होणार की नाही याची धास्ती भाजपाच्या पदाधिकारी व नेत्यांत वेळोवेळी होताना दिसते. परिणामी गेली साडेचार वर्षे क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी पदाधिकारी व नगरसेवकांना विशेष बैठक बोलावून समजसुद्धा दिली आहे. विकासाच्या मुद्यावर एकमत होण्याविषयी वारंवार सांगितल्यानंतरही नगरपालिकेच्या सभागृहात जे व्हायचे तेच झाले. सभागृहात काही पदाधिकारी चर्चा करतात तर काही गप्प बसणे सोईचे समजतात. यावरून एकवाक्यता होत नसल्याने स्पष्ट बहुमत असतानादेखील पराभवाची एकप्रकारे ‘चाहुल’च लागल्याचे बोलल्या जाते. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहर विकासासाठी भरीव योगदान दिले आहे, हे कुणीही विसरू शकणार नाही. मूल शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा त्यांचा ध्यास आहे. नियोजनबद्ध आखणी केली तर निधीची कमतरता भासू देणार नाही हे त्यांनी वारंवार सांगितले. मात्र मूल नगरपरिषदेच्या सत्तारूढ पदाधिकाऱ्यांत नियोजनाचा अभाव पदोपदी जाणवतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर या क्षेत्राला भरीव योगदान देऊ शकतात. त्यासाठी दूरदृष्टीकोन असायला पाहिजे. मात्र ती दृष्टीच नसल्याचे जाणवते. त्यामुळे मूल शहराच्या विकासाला भरीव योगदान देणारे असले तरी त्याचे नियोजन करणारे नसतील तर काय कामाचे? हिच स्थिती सध्या मूल शहरात दिसत आहे. पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात वाढत चाललेली दरी बघता याचा कायदा विरोधी असलेल्या काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसुन येते. नगर परिषदेत भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत असली तर ज्यांना पक्षाची तिकीट मिळणार नाही, ते अपक्ष राहिल्यास कुठे तिरंगी लढत झाल्याचेही आजपर्यंत बघितले आहे. मूल नगर परिषदेवर यापुर्वी काँग्रेसचा दबदबा होता. मात्र मागील निवडणुकीत क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे प्रतिनिधीत्व करीत असल्याने मूल शहराचा विकास साधला जाईल यासाठी लोकांनी उमेदवारांकडे जास्त लक्ष न घालता मुनगंटीवार यांच्याकडे बघूनच मतदान केल्याचे दिसून येते. यावेळी ते राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. विकासाचा मुद्दा काँग्रेस पक्ष किती प्रमाणात उचलून धरून आपली बाजु मांडतात व उमेदवार कसा देतात? यावरच कॉंग्रेसचे भवितव्य ठरणार आहे. यावेळी भाजपा व काँग्रेस योग्य उमेदवारांची चाचपणी करून रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे निवडणुकीला ५ महिन्यांचा कालावधी असला तरी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले
By admin | Updated: April 22, 2016 02:58 IST