कृषी विभागाचे नियोजन : भात आणि सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्रलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षीचा ओला दुष्काळ व रबी हंगामाच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने यावर्षी चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर खरीप पीक पेरणीचे नियोजन केले असून बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असून आता फक्त पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकरी हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. उन्हाचा पार अद्यापही कमी झालेला नसला तरी शेतकरी कामात व्यस्त असून पाऊस पडल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, तूर, कापूस, आदी पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर होणाऱ्या पेरणीद्वारे ९०० लाख ५ हजार क्विंटल उत्पन्न होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. गेल्या दोन-तीन वर्षात शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी खचलेला नसून नव्या जोमाने खरीपाच्या तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ व २०१५ असे सातत्याने तीन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. त्यानंतर २०१५ मध्येही समाधानकारक पाऊस न झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाली. २०१६ ला अतिवृष्टीने काहींची पिके नष्ट झाली. त्यानंतर रबी हंगामातही अनेकदा आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले होते. मात्र यावर्षी चांगल्या उत्पन्नाची प्रतीक्षा आहे. भाताचे सर्वाधिक क्षेत्र यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३६ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तर सोयाबीन १ लाख ६९ हजार हेक्टर, कापूस ५८ हजार ८०० हेक्टर, तूर ३१ हजार हेक्टर, ज्वारी ३ हजार ९०० हेक्टर तर ३ हजार २०० हेक्टरवर इतर पिकांची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. यावर्षी तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल का, अशी चर्चा आहे.७५ हजार ९९९ क्विंटल बियाण्यांची गरजयावर्षी शेतकरी कापूस, तूर, भात व सोयाबिन या बियाण्यांची जास्त मागणी करणार असल्याने कृषी विभागाने याआधीच बियाणांचा साठा करून ठेवला आहे. सार्वजनिक स्वरूपात २५ हजार २६३ क्विंटल तर खासगी स्वरूपात ५० हजार ७३६ क्विंटल बियाण्यांची मागणी असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यापैकी सार्वजनिक मागणीचे ७ हजार २०६ व खासगी मागणीचे २४ हजार ३५२ क्विंटल बियाणे कृषी विभागाकडे उपलब्ध झाले आहे. यापैकी सार्वजनिक व खासगीचे ५ हजार १२६ क्विंटल बियाणांची विक्री आतापर्यंत झाली आहे. बियाण्यांचा ऐन हंगामात काळाबाजार होणार नाही, याकरिता कृषी विभागाने उपाय योजनाही आखल्या असून भरारी पथकाची नेमणूक केली आहे. कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासादोन दिवसांपुर्वीच राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलास देत कर्जमाफी केली. यामुळे जिल्ह्यातील १ लाख १७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांवर लाखोंचे कर्ज थकीत होते. मात्र आता कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांवरील दडपण दूर झाले असून नव्या दमाने शेती करण्यास शेतकरी सज्ज झाला आहे.
चार लाख ७६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी
By admin | Updated: June 15, 2017 00:28 IST