सिंदेवाही : कोरोनामुळे मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू आहे. यामुळे मुलांना वर्गात जाऊन शिकायला मिळत नाही. मित्रांची भेट होत नाही. घरातल्या घरात मुलांचा कोंडमारा होत असल्याने त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. मुलांमध्ये एकटेपणाची भावनाही वाढीस लागली असल्याची व्यथा पालक व्यक्त करीत आहेत.
ऑनलाईनकरिता मोबाईल किंवा संगणक आवश्यक आहे. यासाठी इंटरनेट सुविधा असणे नितांत गरजेचे आहे. काही पालक ही सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरत आहेत. यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. एका घरी दोन मुले असतील तर पालकांची कोंडी होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गात, शाळेत मुले मित्रांच्या सोबत दंगामस्ती करून शिक्षणाचे धडे घ्यायचे. कोरोना महामारीच्या संकटामुळे निर्बंध आले आहेत. त्याला पर्याय म्हणून शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. ऑनलाईन शिक्षणामुळे घराबाहेर पडण्याची गरज नाही. वेळेची व पैशांची बचत काही प्रमाणात होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणाचे महत्त्व कळायला लागले आहे. मुलांना मोबाईल व संगणक हाताळण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. या बाबी सकारात्मक वाटत असल्या तरी मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
कोट
कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण योग्य आहे. कारण घराच्या बाहेर पडणे म्हणजे गर्दीत जाणे आले. त्यामुळे घरीच राहून शिक्षण घेणे योग्य आहे.
संजय रामटेके, पालक
कोट
शालेय वातावरणात शिक्षण घेताना आनंद असतो. मित्रांसोबत मस्ती करीत शाळेत शिक्षण घेता येते. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे घरातल्या घरात एकलकोंडी राहून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढलेला आहे. पालकांची जबाबदारी वाढली आहे.
- महेश परसावार, पालक.