विहीरगाव : राजुरा तालुक्यात २२ ते २३ जुलैदरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सिंधी, धानोरा, टेंभुरवाही, विरूर व परिसरातील शेतीची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पाहणी केली. नुकसानीचे सर्वेक्षण करून तात्काळ मदत देण्याची ग्वाही देखील शेतकऱ्यांना दिली.
राजुरा तालुक्यात सिंधी, धानोरा, टेंभुरवाही, विरूर व परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या परिसरात सोयाबीन व कापूस लागवडीचे प्रमाण अधिक आहे. दोन दिवस पावसाने झोडपल्याने पिकांना जोरदार फटका बसला. भात शेती करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुरामुळे शेती खरडल्याने जेसीबी लावून माती समांतर केल्या जाईल आणि तात्काळ भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, तहसीलदार हरीश गाडे, पं.स. सदस्य कुंदा जेनेकर, उपसरपंच रामभाऊ ढुमने, अविनाश जेनेकर, राजू मोरे, मंगेश रायपल्ले, गुलाब धानोरकर, संजय ढुमने, मंगेश जेनेकर, ओंकार मोरे, भास्कर मोरे आदी उपस्थित होते.