मूल :
शहरात पाय रोवल्यानंतर कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविल्याचे दिसून येत आहे. मूल तालुक्यातील ४४ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून, दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत.
सध्या तालुक्यात २८७ कोरोनाचे रुग्ण असून, मूल शहरात १०७ ,तर तालुक्यात १८० रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कडक लॉकडाऊन काळात यावर उपाय म्हणजे घरी राहा, सुरक्षित राहा हे ब्रीद वाक्य जोपासणे गरजेचे आहे.
कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून, मूल तालुक्यातील १११ गावांपैकी ४४ गावात कोरोनाने आपले पाय पसरविले आहे. रुग्णांची जास्त संख्या असलेले मारोडा, सोमनाथ, ताडाळा, केळझर, बेंबाळ, गडीसुर्ला, नवेगाव भुजला, राजोली, गांगलवाडी, टेकाडी ही गावे असून, उर्वरित गावात रुग्णाची संख्या कमी प्रमाणात आहे, तर तालुक्यातील ७६ गावांत कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून येते. मूूल येथे २२० बेडची व्यवस्था करण्यात आली आली आहे. यात उपजिल्हा रुग्णालयात ७०, तर नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या शाळेच्या इमारतीत १५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी प्रशासन विशेष लक्ष घालत असल्याने नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. सध्या मूल शहरासह तालुक्यात २८७ कोरोनाचे रुग्ण असून, गृहविलगीकरणात १६०, तर कोविड केंद्रात १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार यशवंत पवार, नगरपरिषद मूलचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, गटविकास अधिकारी डॉ. मयूर कळसे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वल इंदुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे ,वैद्यकीय अधिकारी डाॅ. तिरथ उराडे, पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत, आदी वेळोवेळी विशेष लक्ष देऊन उपाय योजना करीत आहेत.