४ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांशी ऑलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माणिकगड सिमेंट, अल्ट्राटेक, गोपानी आर्यन, धारिवाल, लॉयड मेटल्स्, दालमिया सिमेंट, अंबुजा सिमेंट आदी उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आ. मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांनी त्यांच्या परिसरातील शासकीय रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात, कमी वेळात रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे शक्य नसल्यास भाड्याची वाहने उपलब्ध करून द्यावीत, उद्योगातील कामगारांना, त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, जनजागृतीच्या दृष्टीने उद्योगांनी फलक लावावे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर मशीन उपलब्ध कराव्यात, अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या. उद्योगांलगतचा परिसर हा ग्रामीण भाग असल्यामुळे व ग्रामीण भागात घरे छोटी असल्यामुळे विलगीकरणाची व्यवस्था योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. उद्योगांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर तयार केल्यास हा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना ठरेल, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. कामगार, कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने कॉलसेंटर उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सध्या रुग्णांना रेमडेसिविर या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. उद्योगांनी हे इंजेक्शन्स खरेदी करून परिसरातील रुग्णालयांना उपलब्ध करावे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. उद्योगांनी प्रारंभिक उपचारासाठी औषध, गोळ्यांची किट तयार करून ती कामगारांमध्ये वितरीत करावी, कामगार, कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिकांना मास्क वितरण करावे, स्थानिक महिला बचत गटांकडून मास्क तयार करून घेतल्यास त्यांनाही उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल, अशी सूचना त्यांनी केली. गडचांदूर व घुग्घुस या परिसरात संबंधित उद्योगांनी आरटीपीसीआर चाचणी केंद्र करावे व प्रत्येक उद्योगाने दोन रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात याबाबत आ. मुनगंटीवार यांनी उद्योग प्रतिनिधींना सूचना दिल्या. जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाला त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे माणिकगड सिमेंट कंपनीचे काबरा यांनी सांगितले.