कोरोना या संसर्गजन्य आजाराचे निदान करण्यासाठी सध्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या सध्या प्रचलित आहेत. अँटिजेन चाचणीने सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, हे निदान त्वरित होत आहे. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचे निदान यायला सहा ते सात दिवसांचा अवधी लागत आहे. परिणामी आरटीपीसीआर चाचणी केलेली एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असली तरी ती सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्याला काही झालेच नाही, या अविर्भावात कुटुंबात किंवा समाजात खुलेआम वावरत असते. यात या व्यक्तिंचा काही दोषही नसतो. पण, या व्यक्तिंचा संसर्ग कुटुंबातील किंवा समाजातील अन्य व्यक्तिंना होत नसेल हे कशावरून ?
सध्या नागभीड येथे होत असलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे नमुने चंद्रपूर येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. चंद्रपूर येथून निदान झालेला अहवाल येण्यास बराच विलंब होत आहे. कधी कधी सात दिवसांचा अवधी लागत आहे. हे टाळण्यासाठी तालुकास्तरावर किंवा तीन ते चार तालुके मिळून हे चाचणी केंद्र सुरू केल्यास अहवाल त्वरित मिळेल व पाॅझिटिव्ह असलेल्या व्यक्तीवर त्वरित उपचार सुरू करता येतील.