चंद्रपूर : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना टास्क समितीच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना टास्क समितीच्या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता बंडू रामटेके, म.न.पा.चे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर जास्त प्रमाणात आहे, त्या भागात विशेष चमूद्वारे सर्वेक्षण करून कोरोनासदृश्य लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या वाढविल्यास कोरोनाचा फैलाव रोखता येईल व वेळीच रुग्णाची ओळख पटल्याने औषधोपचाराद्वारे कोरोना मृत्यूचा संभाव्य धोकादेखील टाळता येईल. दुसरा सिरो सर्व्हे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देताना सामान्य रुग्णालयाने कोरोना प्रश्नावर गंभीर होण्याची आवश्यकता असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बाॅक्स
तयारीला लागा
१ मार्चपासून ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाचे निर्देश असून याबाबत आरोग्य यंत्रणेने तयारी पूर्ण करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.