कोरपना : तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक शहर असून, याठिकाणी लोकसंख्येचे प्रमाण खूप जास्त आहे. येथील वाढलेल्या लोकसंख्येबरोबरच अवैध धंद्यांमध्येही झपाट्याने वाढ होत असल्याने गडचांदूर शहर सध्या अवैध व्यावसायिकांचे माहेरघर बनले आहे.
याठिकाणी अवैध धंदे करणाऱ्या तब्बल २६ व्यावसायिकांची यादी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. गडचांदुरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत असून, याकडे आपण जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, गृहमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.