सास्ती : राजुरा शहराच्या आठवडी बाजार वॉर्डातील नागरिकांने घराशेजारी होत असलेल्या अतिक्रमणाबाबतची तक्रार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, अभियंता, बांधकाम सभापती आणि नगरसेवकांकडे महिनाभरापूर्वी करून अतिक्रमण थांबविण्याची विनंती केली. महसूल विभागाकडेही तक्रार केली. परंतु प्रशासनाने तक्रारीला केराची टोपली दाखविल्यामुळे नेमकी तक्रार करायची कुणाकडे? असा सवाल केला जात आहे.
राजुरा शहरातील आठवडी बाजारात राहणाऱ्या शीला सुभाष पिंपळकर आणि आनंदराव शंकर पिंपळकर, तसेच वासुदेव संभाजी झाडे यांच्या मालमत्तेच्या दक्षिण बाजूस खरेदीखतानुसार दहा फुटांचा रस्ता दाखविलेला आहे. या भागात यांच्या घरातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या पाइपलाइनसुद्धा आहेत. परंतु या भागात येथे राहणारे राजू कवठे यांनी अतिक्रमण करून बांधकाम करण्याच्या दृष्टीने पिल्लरसाठी खड्डे खोदून काम सुरू केले आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून जाणारी पाइपलाइन फुटल्या गेली व सांडपाणी उघड्यावर वाहत आहे.
याबाबत नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, अभियंता आणि बांधकाम सभापती यांच्याकडे १५ फेब्रुवारीला निवेदनाद्वारे स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या निकाली काढण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु याकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत पुन्हा २४ फेब्रुवारीलासुद्धा एक स्मरणपत्र देऊन याबाबत तक्रार केली होती. परंतु याकडेही दुलक्ष करण्यात आले. त्यानंतर ३ मार्च रोजी नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, अभियंता आणि बांधकाम सभापती यांच्यासह राजुराचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना तक्रारीच्या प्रति देण्यात आल्या. परंतु आज दहा दिवसांचा कालावधी लोटूनही तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी समस्यांबाबत नेमकी तक्रार कुणाकडे करायची? असा सवाल केला आहे.