राजुरा : मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या राजुरास्थित उपविभागीय वनाधिकाऱ्याचे पद ५ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या परिसरातील वनसंरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असून वनाधिकाऱ्यांअभावी विविध कामे खोळंबली आहेत.राजुरा येथे कार्यरत उपविभागीय वनाधिकारी यांची पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर येथे अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. राजुरा उप वनविभाग अतीसंवेदनशील, पहाडी भाग असुन आंध्र प्रदेश सीमेला लागून आहे. त्यामुळे वनाचे संरक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर येथील सहाय्यक वनसंरक्षकाकडे येथील पदभार असल्यामुळे ते येथे पुर्णवेळ देत नाही. त्याचा परिणाम वनाचे संरक्षण, संवर्धन, अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, रेतीची अवैध वाहतुक, वन हक्काचे प्रकरणे आदी बाबीवर दुर्लक्ष होत आहे. तर वेळेवर कामे पुर्ण होत नसल्यामुळे अनेक कार्यालयीन कामे प्रलंबीत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कनिष्ठ वन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने ते सुद्धा सुस्तावले आहे. याची दखल घेवून वनाधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याकडे लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करावी. (तालुका प्रतिनिधी)
सेनापती नसल्याने वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By admin | Updated: February 13, 2015 01:26 IST