सुजाता बाकडे या फसवेगिरी करणाऱ्या महिलेने पैशांची चणचण असलेल्या महिलांना हेरून आठ दिवसांत दामदुप्पट होण्याचे आमिष दाखविले. केवळ आठ दिवसच आपले पैसे गुंतून राहतील त्यानंतर आपल्याला दुपटीने पैसे मिळणार, या आशेने आमिषाला बळी पडलेल्या महिलांनी पैशाची जमवाजमव सुरू केली. कित्येकांनी आपल्या अंगावरील सोने तारण ठेवून कर्ज घेतले, बचत गटातून व्याजाने पैसे काढले, नातलगांना उसनवारीने पैसे मागितले. अशा प्रकारे जेवढा जास्त पैसा गोळा करता येईल तेवढा गोळा केला. यासह घरातील उरलेसुरले असे सारे पैसेही फसवेगिरी करणाऱ्या सुजाता बाकडेच्या स्वाधीन केले.
आजघडीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता त्यांच्या घरात एकही पैसा शिल्लक नाही. अशी पीडितांची विदारक परिस्थिती झाली आहे. पोलीस फसवेगिरी करणाऱ्या महिलेची कसून चौकशी करून आपला पैसा परत मिळवून देतील, या आशेने पीडित महिला दररोज पोलीस ठाण्यात येरझारा घालीत आहेत.