कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला. आता तर या रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्हाभरात ११ डीसीएच, २९ डीसीएससी व १८ सीसीसी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडची लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे, तसेच गंभीर लक्षणे अशा तिन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी तातडीने आरोग्य सुविधा निर्माण करण्यात प्रशासनाने मार्च महिन्यात झपाट्याने काम केले. त्याचे परिणामही दिसून आले. लक्षणे नसणाऱ्यांचे गृहविलगीकरण व सौम्य लक्षणे असणाऱ्यांना सीसीसीमध्ये दाखल करून उपचार सुरू झाले. कोरोना संसर्ग साखळी रोखण्यासाठी ११ डीसीएच, डीसीएससी व सीसीसी रुग्णालयांची व्याप्ती महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र, गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी झालेल्या रुग्णांना तत्काळ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याच्या आघाडीवर प्रशासनाला अजूनही पूर्णत: यश आले नाही. सद्यस्थितीत १,२९६ ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होऊ शकले, पण सर्व बेड्स फुल्ल आहेत. त्यामुळे नियोजित १,४०० बेड्स केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
सीसीसीच्या १७०० बेड्सचे काय?
जिल्ह्यातील १८ कोविड केअर सेंटरमध्ये २,८०० बेड्स उपलब्ध झाल्या. संसर्गाचा वेग लक्षात घेऊन पुन्हा १,७०० बेड्सचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, यासाठी इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. चंद्रपुरातील महिला रुग्णालयात १७५ ऑक्सिजन बेड्स उपलब्ध झाले. पुन्हा १७५ बेड्सच्या नियोजनाची कार्यवाही सुरू असल्याचे समजते. गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाने इमारती ताब्यात घेण्यासोबतच बेड्सचा प्रश्न सोडविला पाहिजे.
चंद्रपूर मनपाचे जम्बो हॉस्पिटल कागदावरच
जिल्ह्यात ५०० बेड्सचे जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यामध्ये ४०० ऑक्सिजन बेड्स व १०० आयसीयू बेड्स तयार करण्यात येतील, असेही प्रशासनाने जाहीर केले. गंभीर रुग्णांची संख्या बघता, आता हे जम्बो हॉस्पिटल कार्यान्वित करण्याची गरज आहे. मनपाने रैन बसेरा येथे हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली, पण हे हॉस्पिटल कागदावरच आहे. वन अकादमीतील १५० ऑक्सिजन बेड्सचे काम सुरू असल्याने हाच एक दिलासा आहे.
तालुक्यातील बेड्सला विलंब
सर्वच तालुक्यात सुमारे ३० ते ५० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली. यातील काही रुग्णालयांचे काम सुरू झाले, पण या कामाला आधीच विलंब झाला. हे काम विहित कालावधीत मार्गी लागले नाही, तर कोविडबाधित गंभीर रुग्णांच्या मृतांची संख्या पुन्हा वाढू शकते.
ऑक्सिजन मुबलक, बेड्सची कमतरता
जिल्ह्याला ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच महिला रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू आहे. याशिवाय क्रायोजेनिक आक्सिजन जनरेट प्लांट उभारल्या जात आहे. या प्लांटमधून दररोज ५०० सिलिंडर रिपिलिंग करता येऊ शकतात. प्लांटमधील आक्सिजन शुद्धताही ९८ टक्के राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा नाही, तर बेड्सचीच कमरता आहे. हेच आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.