माई फाऊंडेशनची माणुसकी : अमोल देवगीरकर यांचा तीन वर्षांपासून प्रेरणादायी उपक्रम
अमोद गौरकर
शंकरपूर : मानवी जीवनात मृत्यू अटळ असतो. पण तो अकाली नको. मृत्यूनंतर अंत्यविधी सन्मानानेच व्हावा हीच संस्कृतीची शिकवण होते. मात्र, बेवारस मुकी जनावरे- प्राण्यांच्या वाट्याला हा सन्मान येत नाही. ही वेदना हृदयाला टोचल्याने
येथील माई फाउंडेशनचे अमोल देवगीरकर या युवकाने मृतक जनावरे- प्राण्यांना सन्मानपूर्वक दफनविधी करण्याचा प्रेरणादायी उपक्रम तीन वर्षांपासून राबवत आहे.
अमोल देवगीरकर हे शंकरपुरात पॅथालॉजी सेंटर चालवितात. त्यांनी माई फाऊंडेशनची स्थापना केली. रस्त्यावरील अपघातात कुत्री, मांजरे, गायी बैल व अन्य प्राणी मृत पावतात. त्यांचा कुणीच वाली नसल्याने अनेक दिवस रस्त्याच्या कडेला पडून राहतात. दुर्गंधी सुटते. पण सन्मानाने दफनविधी करण्यास कुणीही पुढे येत नाही, हे चित्र अमोलने अनेकदा पाहिले. मुक्या जनावरांची विटंबना पाहून अस्वस्थ झाले. काही ग्रामपंचायतींचे कर्मचारी मृतक जनावरे गावाच्या वेशीवर फेकून निघून जातात. त्यामुळे कुणाची वाट पाहण्यापेक्षा आपणच कर्तव्य बजावले पाहिजे, हा असा विचार करून पाऊल उचललेले. माई फाऊंडेशनच्या वतीने तीन वर्षांपासून मृतक जनावरांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करीत आहेत.
बॉक्स
नि:शुल्क सेवा, स्वत:च देतात १०० रूपये
‘आमच्या शहरात, वार्डात, गावात मृतक जनावरे, कुत्री रस्त्यावर पडून आहेत’ असा दूरध्वनी आला की लगेच तिथे अमोल दाखल होतो. सन्मानपूर्वक दफनविधीसाठी एखादा व्यक्ती सोबतला आला तर त्यालाच १०० रूपये देतात. स्वखर्चातील या प्राणीसेवेचे कुणाला अप्रप वाटो किंवा नको. ही सेवा आजही चिमूर व नागभीड तालुक्यात अविरत सुरू आहे.
कोट
जनावरे, प्राणी जीवंत असताना मानवासोबत वावरतात. सहचर होतात. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्यावरही मानवासारखे अंतिम संस्कार होणे आवश्यक आहे. कोरोना काळात तर आता नागरिकांची जबाबदारी पुन्हा वाढली. सन्मानपूर्वक अंत्यविधी हा प्राण्यांचाही हक्क आहे, हा मानवी विचार साऱ्यांनी स्वीकारल्यास मला आनंदच होईल.
-अमोल देवगीरकर, माई फाउंडेशन, शंकरपूर