पळसगाव (पिपर्डा) : मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकटकाळी खेड्यापाड्यापर्यंत पुढारी, सामाजिक संघटना, गाव कार्यकर्ते यांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला होता; परंतु यंदा मात्र कोणीच कुणाला मदत करताना खेड्यात दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत मदत करणारे गायब झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व समाजातील सदृढ नागरिकांनी गोरगरीब, गरजू विधवा महिलांना अन्यधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, साखर, पीठ आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी सर्वजण काळजी घेत होते. मात्र, यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोरगरीब मुजरांकडे पैसे नसताना त्यांना मदतीचा हात देण्यास कुणीही पुढे येत नसल्याचे चित्र खेड्यात दिसत आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता दोनवेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे. दुसरीकडे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून सोशल मीडियावर फोटो सेशन करणाऱ्यांनी यावर्षी मात्र मदतीचा हात आखडता घेतला आहे. मागील वर्षी केंद्र व राज्य सरकारने गावागावात नागरिकांना मदतीचा हात दिला. मोफत धान्य वाटप केले होते. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत या बाबी कमी दिसत आहेत. यावर्षी कोरोनाने चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे.