जिवती: अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे. तालुक्याच्या निर्मितीला १३ वर्षे लोटली आहेत. मात्र जिवती तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात विकास कामे झाली नाहीत. तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयातील विविध विभागातील पदे रिक्त आहेत. त्यातच कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे विकासाला गती मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून जनतेला नियमित सेवा द्यावी, वेळेवर जनतेची कामे व्हावीत, यासाठी शासनाने प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जारी केले असले तरी कुठल्याच विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची स्थिती आहे. याला कार्यालयातील मुख्य अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहेत. स्वत: अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचारी मुख्यालयी कसे राहतील, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तालुक्यातील महसूल विभागात तहसीलदार, अन्न पुरवठा अधिकारी व एक-दोन लिपीक व शिपाई वगळता अन्य कोणतेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बांधकाम विभाग, वनविभाग, कृषी विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पंचायत समिती, तलाठी व ग्रामसेवकांची कार्यालये असली तरी कोणत्याच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर कधीच होत नाहीत. परिणामी नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. अनेक अधिकारी कर्मचारी तर मिटींगच्या नावाखाली वारंवार सुट्या घेतात. आठवडा-आठवडा कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबून राहतात. आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य केंद्रातही हीच परिस्थिती आहे. कधी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही तर कधी परिचारिका बेपत्ता असते. हा प्रकार नेहमीचाच असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात शिक्षण विभागही मागे नाही. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षकही मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवितात. परिणामी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासाळली आहे. महिनोगंती अधिकारी शाळा भेटीसाठी येत नाहीत. त्यामुळे शिक्षकांवर कुणाचेही नियंत्रण नाही. ते शिकविण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. डाक पोहोचविणे, मिटिंग इत्यादी कामाचा बहाणा करुन निघून जातात. त्यामुळे अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येत नाही, कधी पालक भेटीही होत नाही. (तालुका प्रतिनिधी)
जिवतीतील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी
By admin | Updated: February 1, 2015 22:54 IST