गैरसमज किंवा किरकोळ वादाचे पर्यवसान कुटुंब एकमेकांपासून विभक्त होण्याचे प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. असे प्रकार होऊ नयेत, त्याचबरोबर तक्रारदारांना कोर्टकचेरीचा मानसिक व आर्थिक त्रास होऊ नये या हेतूने शासनाने या कक्षाची निर्मिती केली आहे. हे कक्ष चंद्रपूर येथे कार्यरत होते; पण ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यांना चंद्रपूरचे हे कक्ष अतिशय गैरसोयीचे ठरत असल्याने दोन वर्षांपूर्वी नागभीड येथे नागभीड, तळोधी, ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही पोलीस ठाण्यांच्या मदतीला नागभीड येथे हे साहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या ठाण्यांमध्ये कौटुंबिक वादाच्या तक्रारी आल्या की हे पोलीस ठाणे या साहाय्यता कक्षाकडे रेफर करतात.
नागभीडच्या या साहाय्यता कक्षात जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत या एकूण ३०२ तक्रारी आल्या. यापैकी १४० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यातील बहुतेक तक्रारींना कौटुंबिक आणि पती-पत्नीमधील वादाचीच झालर होती. या ३०२ तक्रारींपैकी ६३ वाद या कक्षाने समझोत्यातून निकाली काढले आहेत. आज हे कुटुंब सुखाचा संसार करीत आहेत. यातीलच १९ तक्रारी कायदेशीर सल्ला मागण्यासाठी न्यायालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. १२ तक्रारी पोटगीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आलेल्या तक्रारींपैकी १३ पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या, तर २७ तक्रारींमध्ये तक्रारदारांकडून सहकार्य मिळत नसल्याने मागे ठेवण्यात आल्या आहेत.
बॉक्स
समुपदेशक देतात गृहभेटी
हे कक्ष केवळ दोघांचा समझोता करून त्यांचे संसार मार्गी लावण्याचे काम करण्याबरोबर त्यांच्यात समझोता झाल्यानंतर त्यांचा संसार कशाप्रकारे सुरू आहे, हे बघण्यासाठी कक्षाचे समुपदेशक गृहभेटीही देत असतात. अशोक कुळमेथे या कक्षाचे समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत.