लॉकडाऊन व कोरोना उपाययोजनेसंदर्भात तातडीने घेतला आढावा
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून तसेच राज्यातून ऑक्सिजनची अतिरिक्त मागणी करून योग्य पद्धतीने वितरण करावे, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनची ज्या रुग्णाला खरंच अत्यावश्यकता आहे, त्या रुग्णाला ते देण्याचे नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. मृत्यूदरही वाढलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करताना कालावधी लागला असला, तरी बऱ्याच प्रमाणात व्यवस्था रुळावर आणण्याचे काम या कालावधीत झालेले आहे. जिल्ह्यात महिला रुग्णालयामध्ये ४४ अतिरिक्त बेड वाढविण्यात आले असून, कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्येक तालुकानिहाय १०० बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासह जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये तालुका स्तरावर चार हजार बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अन्न व औषध प्रशासन अधिकारी नितीन मोहिते उपस्थित होते.
बॉक्स
मनुष्यबळ वाढविणार
या संकटाच्या प्रसंगी रुग्णांवर वेळेत योग्य ते उपचार व्हावेत, यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्नरत असून, येत्या काही दिवसात मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास अतिरिक्त ३५० बेड सुरू करण्याचे नियोजित आहे.
शासकीय यंत्रणेवरील भार कमी व्हावा, तसेच रुग्णांवर उपचार व्हावेत, यासाठी कोविड काळात खासगी रुग्णालयांना परवानगी दिली व ती आवश्यकही होती. यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.