चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसीतील एकाच व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या ग्रेस आणि सिद्धबली इस्पात कंपनीकडून कामगारांचे शोषण होत आहे. तसेच उद्योगांकडून प्रदूषण ओकले जात असल्याच्या कामगारांच्या तक्रारीवरुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच कामगार मंत्री, उद्योग मंत्री यांना निवेदन दिले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगेच दखल घेत दोन्ही उद्योगांच्या चौकशीचे आदेश कामगार आयुक्तांना दिले आहे.
ग्रेस व सिद्धबली इस्पात कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांना वेठीस धरले जात असून, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व कल्याणकारी फायदे दिले जात नाही. या परिसरातील शेतपिकांचेही प्रदूषणामुळे मोठे नुकसान होत आहे. कामगारांकडून व्यवस्थापनाकडे मागणी केल्यानंतर संबंधित कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. इतर कामगारांना नाहक त्रास देण्याचा प्रकारही या दोन्ही उद्योगांच्या व्यवस्थापनाकडून सुरू असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडे कामगारांनी केली होती. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या व कामगार कायद्याची पायमल्ली करणाऱ्या ग्रेस व सिद्धबली कंपनीचा परवाना तत्काळ निलंबित करावा, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. दरम्यान, पालकमंत्री वडेट्टीवार यांनी तत्काळ दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहे. यासंदर्भातील अहवाल एका आठवड्यात देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.