भद्रावती तालुक्यात भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषाणूबाधित व इतर रुग्णांकरिता वैद्यकीय सुविधा गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत श्री मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर उभारून ते प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या सेंटरमध्ये नि:शुल्क उपचार व भोजन व्यवस्था, ऑक्सिजन, सॅनिटायझरसह आरोग्यविषयक सेवा पुरवून आवश्यक औषधी साठा सुद्धा पुरविला जात आहे. मागणीप्रमाणे कोविड सेंटरला इतर आवश्यक त्या सेवा पुरविणे अविरत सुरू आहे. अनेक रुग्ण या नि:शुल्क कोविड सेंटरचा लाभ घेत आहेत. हेल्पलाईन द्वारा वैद्यकीय सल्ला व त्रस्त रुग्णांना तत्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. अशातच आता शिंदे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये कोरोनाबाधित व इतर रुग्णांकरिता निःशुल्क ओपीडी सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून कोरोनाबाधित व इतर रुग्णांकरिता नि:शुल्क ओपीडी केलेली आहे. गरजू रुग्णांनी या मोफत ओपीडीचा लाभ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर सांयकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत घ्यावा, असे आवाहन डॉ. विवेक नि. शिंदे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी केले आहे.
शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ओपीडी नि:शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST