कोरपना : बुधवारी मध्यरात्री कोरपना येथील महसूल विभागाने नदीघाटात धाड टाकून पाच ट्रॅक्टर जप्त केले. ही कारवाई कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामुळे रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
यामध्ये वनसडी, पिपरी, नारंडा येथील प्रत्येकी एक तर वनोजा येथील दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून पैनंगगा नदीच्या वनोजा घाटातून उपसा करीत होते. या सर्वांना जप्त करण्यात आले. कोरपना तालुक्यात रेती तस्करीला मोठ्या प्रमाणात ऊत आल्याने महसूल विभागाने ही मोहीम राबवली. या मोहिमेत कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, गडचांदूरचे मंडळ अधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वात तलाठी प्रकाश कमलवार, मडावी, कुडमेथे, कोसनकर, मासिरकर, कावळे ,गोसाई यांनी ही कार्यवाही केली. तहसील कार्यालयात वाहने आणण्यासाठी तहसील कार्यालयाचे वाहनचालक नागोसे यांनी सहकार्य केले.