महिलांची पिळवणूक चिंताजनक : महिला मुक्ती दिनानिमित्त विचार व्हावा प्रकाश काळे गोवरी महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी आजही समाजात महिलांची होणारी पिळवणूक चिंतेचा विषय आहे. दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महिलांचा आयुष्यभर हक्कासाठी लढा सुरु आहे. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. तसेच महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात समाािजक संघटनांच्या माध्यमातून स्त्री सुरक्षिततेच्या लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन होत करावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत. त्यांना हक्कासाठी झुंजतांना संपूर्ण आयुष्यच मातीमोल करावे लागले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा अधिकार मिळतो, हा प्रश्न साऱ्यांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे असले तरी प्रत्यक्षात आज किती महिला सुरक्षित आहेत, याचाही महिला मुक्तीदिनी विचार झाला पाहिजे. आज दिवसा रस्त्याने जाणारी महिलाही सुरक्षित नाही रस्त्याने जाताना तिला अनेकांचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. मग कायदा कडक करुन चालणार नाही. तर महिलांविषयी प्रत्येकांच्या मनात असलेली सहानुभूती असणे, समाजिक परिवर्तन करणे आज काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले आहे. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना काम करण्याची संधी मिळाल्याने स्त्री प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तरीही महिलांना जीवन जगत असताना त्यांचे हक्क व पुरेपूर अधिकार मिळत नाही, हे समाजातील महिलांचे धकधकते वास्तव आजही कायम आहे. महिलांची समाजात होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कडक कायदे केले आहे. परंतु महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महिला मुक्तीचा डांगोरा देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटीे फिरायला भीती का वाटते, हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. तो स्त्री स्वातंत्र्याचे वाभाडे काढणारा आहे. महिलांना त्यांचे अधिकार हक्क मिळाले म्हणजे स्त्री मुक्त झाली, असे आपण्याला म्हणता येणार नाही. तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी होऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तेव्हाच कुठे आपणाला महिलामुक्ती दिन साजरा करण्याचा अभिमान वाटेल. अन्यथा सुरक्षिततेअभावी महिलांचा जीवन प्रवास क्षणाक्षणाला असाच काळरात्र ठरेल. काय केला जातो आजही महिलांवर अन्याय? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतु आज महिलांवर होणारा अन्याय अत्याचार चिंतेचा विषय झाला आहे. यावर समाजवर्तुळात विचार मंथन करणे गरजेचे आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा लढा आयुष्यभर
By admin | Updated: January 3, 2017 00:40 IST