चिमूर तहसील जाळपोळीला उजाळा : संघर्ष समिती ठरतेय नाममात्र राजकुमार चुनारकर चिमूर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजाविरुद्ध ‘चलेजाव’ चे आंदोलन करीत १६ आॅगस्ट १९४२ ला मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक क्रांतीकारक शहीद झाले. त्यामुळे चिमूर शहराला विशेष दर्जा देवून चिमूरला क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी मागील ३६ वर्षापासून अनेक आंदोलने करण्यात आली. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून चिमूर शहरात तत्कालीन आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांच्यासह तहसील कार्यालयावर सवरपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने हिंसक वळण घेत ५ जानेवारी २००२ ला तहसील कार्यालयाला आग लावून राख रांगोळी केली. या घटनेला आज पंधरा वर्षाचा काळ झाला. मात्र चिमूरकरांना आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे पंधरा वर्षानंतरसुद्धा चिमूर क्रांती जिल्ह्याचे स्वप्न धुसर झाल्याची भावना जनमाणसात उमटत आहे. देशात इंग्रज राजवट असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता चिमूर शहरातील क्रांतीकारकांनी आंदोलनात सहभाग घेतला व १६ आॅगस्ट १९४२ ला चिमुरात इंग्रज अधिकाऱ्यांचे मुडदे पाडत चिमुरात स्वातंत्र्याचा पहिला उदय झाला. त्यामुळे चिमूर शहर देशात प्रथम तीन दिवस स्वतंत्र झाल्याची घोषणा बर्लीन रेडीओवरुन सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. या क्रांतीकारकामुळे चिमूरचे नाव इतिहासात कोरले गेले. चिमूर परिसरातील नागरिकांचा भावनिक प्रश्न असल्याने या मागणीकरिता अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आंदोलने केली आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय जिल्हा कृती समितीने राष्ट्रपतीपासून प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांना निवेदने देत आंदोलने केली. अशाच आंदोलनांचा भाग म्हणून ५ जानेवारी २००२ मध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येत मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागले व मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आग लावून जाळपोळ केली. यामध्ये शासकीय वाहनासह अनेक महत्वाचे दस्ताऐवज जळाले होते. या जाळपोळीमध्ये सहभागी असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. आज या तहसील कार्यालयाच्या जाळपोळीला पंधरा वर्षाचा काळ होत आला आहे. मात्र चिमूरकरांना सर्वत्र राजकीय पुढाऱ्याकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. तत्कालीन चिमूरच्या विधानसभा निवडणुकीत तर नारायण राणे यांनी ‘तुम मुझे आमदार दो, मै तुम्हे जिल्हा दुंगा’ असे आश्वासन दिले. चिमूरकरांनी राणेंना विजय वडेट्टीवारांच्या रुपाने आमदार दिला. पण चिमूरकरांना जिल्हा देऊ शकले नाही. चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रत्येक वर्षाला १६ आॅगस्टला निवेदन देवून साखळी उपोषण करण्यात येतात. मात्र यावर्षी १६ आॅगस्टपूर्वीच कृती समितीने उपोषणाचे हत्यार उपसले व उपोषणानंतर घटानांद, धरणे व विधानसभेवर आंदोलन करण्याचे ठरविले. मात्र आंदोलने झाली नाही. त्यामुळे चिमूर जिल्हा क्रांती समितीचे आंदोलनही नाममात्र ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. देशात व राज्यात सत्ता परिवर्तन होवून भाजपाच्या हातात सत्ता आली व चिमूरचे आमदार म्हणून भाजपाचे किर्तीकुमार भांगडिया चिमूरचे आमदार झाले. त्यांनी १६ आॅगस्ट २०१६ ला शहीद स्मृतीदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आणले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या मागणीला सरळ हात न घालता बालाजी महाराज तुमच्या मागण्या पूर्ण करणार, असे सांगितले. मात्र आमदार मितेश भांगडिया व किर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर क्रांती जिल्हा होणे हे काळ्या दगडावरची रेष असल्याचे चिमूरकरांना सांगितले. मात्र तब्बल पंधरा वर्षानंतरही चिमूरकरांना आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्ह्याचे स्वप्न धुसर झाल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. इंग्रज राजवटीत चिमूर हा परगणा जिल्हा होता. त्यामुळे स्वतंत्र्य भारतातील राज्यकर्त्यांनी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा. तसेच चिमूर जिल्ह्याची मागणी ३७ वर्षे जुनी आहे. मात्र राज्यकर्त्यांकडून आश्वासनापलिकडे काही मिळाले नाही. तेव्हा चिमूरला क्रांती जिल्हा बनवून शहीदांना मानवंदना द्यावी. - दामोधर काळे (गुरुजी) स्वातंत्र्य संग्राम सैनिक चिमूर
पंधरा वर्षानंतरही चिमूर क्रांती जिल्ह्याचे स्वप्न धूसर
By admin | Updated: January 5, 2017 00:49 IST