कन्हाळगाव क्षेत्रातील प्रकरण : अद्याप साधी चौकशीदेखील नाहीकोठारी : एफडीसीएमच्या मध्य चांदा विभागाला हादरवून सोडणारा प्रकार कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात घडला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याच यंत्रणेकडून हा बेकायदेशीर प्रकार घडला. हा गंभीर प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस येऊनही एफडीसीएम प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.निर्धारित क्षेत्रात बांबू कटाई करायची असताना सीमांकन क्षेत्राबाहेरील बांबू वनावर एफडीसीएमच्या यंत्रणेनी हात साफ केला. यंत्रणेला केवळ परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३१ मधील बांबूच्या कटाईची मुभा होती. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन बेकायदेशीररीत्या कक्ष क्रमांक १३९ मधील ओल्या व भरीव बांबूची बेसुमार कत्तल केली. कक्ष क्रमांक १३१ मध्ये १३९ च्या तुलनेत बांबूचे वन फार दुर्मिळ बघायला मिळते. मात्र, अजूनही एफडीसीएमच्या यंत्रणेने या प्रकाराला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्रयस्थ विभाग किंवा व्यक्तींकडून असा प्रकार घडला असता तर पुरते एफडीसीएम खडबडून जागे झाले असते. मात्र बेकायदेशीर बांबूतोडीचा हा प्रकार खुद्द त्यांच्या यंत्रणेकडूनच घडल्याने सध्या या विषयावर कुणीच बोलायला तयार नाही. पाच- दहा नव्हे, तर तब्बल ५० ते ६० हजार बांबूची कत्तल केल्याचा अंदाज आहे. सदर खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणातील एफडीसीएमच्या यंत्रणेची भूमिका हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सुरुवातीला मजुरांच्या झोपडीसाठी १० ते १५ बांबूची कक्ष क्रमांक १३९ मधून कटाई केल्याचे सांगितल्या गेले. यानंतर लगेच २४ तासातच वन कर्मचाऱ्यांचा सूर बदलला. त्यांच्या वर्तुळात केवळ २०० ते ३०० बांबूची बेकायदा कत्तल करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे वन कर्मचारी अजूनही या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील वनाधिकारीसुद्धा प्रकरणातील वेगवेगळे पैलू दिवसागणिक उघड होत असल्याचे पाहून चांगलेच चक्रावले आहेत. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी अजूनपर्यंत या बेकायदेशीर कारनाम्याची चौकशी करण्याचे धाडस केले नाही. शेवटी कन्हाळगाव परिक्षेत्रातील कामे येथील वनाधिकाऱ्यांच्या देखरेख व नियंत्रणाखाली आतापर्यंत होत आली. असताना बांबूतोड प्रकरणातील मार्गदर्शक कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकार आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एफडीसीएमच्या यंत्रणेनी केला असावा, असा तर्कसुद्धा लावला जात आहे. दुसरीकडे उद्दिष्टपूर्ती झाली असल्यास घनदाट जंगलात घडलेल्या या प्रकारातून यंत्रणा कर्मचाऱ्यांचे हित साधणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या लिलावात परिसरातील बांबूचा दर ३५ ते ४० रुपये सुरु असल्याची माहिती आहे. हाच बांबू ठेकेदाराला कमी दरात मिळाल्यास ते या बाबूंची केव्हाही उचल करतील. अशावेळी येथील बांबूच्या साठ्याची महिनाभरापासून अजूनपर्यंत उचल केली नसल्याने हा बांबू लिलावात जाणार की, इतर कुठल्या मार्गाने याचा बंदोबस्त लावला जाईल, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (वार्ताहर)
बेकायदा बांबूतोडीनंतरही एफडीसीएम झोपेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:40 IST