देवाडा(खुर्द) : शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामांवर परिणाम होत आहे. आधीच विविध प्रकोपामुळे शेतकर्यांच्या हातात काहीच आले नसतांना खरीपाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे.तालुक्यात महिन्याकाठी विविध योजनेअंतर्गत हजारो क्विंटल धान्य स्वस्त दरात वितरित केले जाते. याचा लाभ परिसरातील हजारो कुटूंबाना मिळते. त्यामुळेच ग्रामीण भागातील ‘सुगी’चे महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी वर्षभराचे धान्य जमविण्यासाठी सुगीच्या काळात रोख मजुरी सोडून प्रत्येक जण शेतावर राबत होता. मात्र आता स्वस्त दरात धान्य मिळत असल्याने शेतात राबण्यास फारसा मजूर वर्ग तयार होत नाही. शेतकर्यांनाही पिकांची काढणी धान्याऐवजी रोख देऊनच करावी लागत आहे.ग्रामीण भागात पूर्वी शेतकरी मजुरांना धान्य स्वरूपातच मोबदला देत होता. त्यामुळे रोख उत्पन्न देणार्या पिकासोबतच ज्वारी, उडीद, मुंग, आदी पिके घेतली जात होती. शासनाच्या अंत्योदय व दारिद्रय़ रेषेखालील घटकांसाठीच्या स्वस्त धान्य योजनेमुळे एका कुटूंबाला महिन्याकाठी ३५ ते ४0 किलो धान्य स्वस्त दरात मिळत आहे. अतिशय कमी किंमतीत धान्य मिळत असल्याने मजुरांनी धान्यासाठी मजुरी करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे ज्वारी, उडीद, मुंग ही पिके सुद्धा नगदी पैसे घेऊन काढावी लागत आहे. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक झाल्याने शेतकर्यांनी ज्वारी व इतर कडधान्याचा पेराच कमी केला. त्याऐवजी सोयाबीन व हरभर्याची लागवड मोठय़ा प्रमाणत केली जात आहे. ही दोन्ही पिके अन्य कालावधीत येतात. इतर पिकांच्या तुलनेत कमी मजूर लागतात. निंदणाला पर्याय म्हणून शेतकरी तणनाशकाचा वापर करीत आहे. मात्र याच्या अतिरेकी वापराचा परिणाम थेट जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता आहे. दुष्परिणाम माहिती असुनही केवळ मजूर मिळत नसल्याने शेतकर्यांकडून तणनाशकाचा उपयोग केला जात आहे. गुरांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात गोधनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेणखताला पर्याय म्हणून रासायनिक खताचा उपयोग वाढला आहे. शेतावर राबण्यास पुरुष कामगार मिळत नाही. सालदाराचे सालही महागले आहे. त्यामुळे सालगडी माणूस भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती व्यवसायात डबघाईस आला आहे. (वार्ताहर)
वाढत्या मजुरीने शेतकरी त्रस्त
By admin | Updated: May 30, 2014 23:36 IST