राजकारण निघाले ढवळून : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हवस्या-गवस्यांना जोरखडसंगी : जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या अगोदरच लोकसभा, विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात निवडणुकांचा हंगाम सुरू असून हौसे, नवसे, गवसे सध्या जोरात आहेत. तसेच गावपुढाऱ्यांचा बाजार वधारला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणात शेतकरी मात्र पावसाअभावी हताश दिसून येत आहेत.चिमूर तालुक्यातील निवडणुकांचे वारे पाहिले तर चिमूर विधानसभा क्षेत्रात राज्याच्या सत्तेसह स्थानिक सत्तेमध्ये सुद्धा बदल घडला आहे. तथा नुकत्याच झालेल्या सहकारी पतसंस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये कोणत्या एका पक्षाला सत्ता प्राप्त करता आली नाही. तालुक्यात ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यासाठी हजारो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. म्हणजेच ग्रामीण भागात लोकशाही किती प्रगल्भ आहे, हे दिसून येते. ८२ ग्रामपंचायतीपैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. एकीकडे पाऊस नाही, त्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पावसाअभावी अजूनही १०-२० टक्केही रोवणी झाले नाही. त्यामुळे भात उत्पादक हवालदिल झाला आहे. तसेच महागाई कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने ‘अच्छे दिन’ ऐवजी ‘बुरे दिन आले की काय’ अशी शंका घेण्याईतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कर्जबाजारीपणामुळे गावकडचा शेतकरी हैराण झाला आहे. असे असताना देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस वाढत आहे. प्रश्न अनेक आहेत, मात्र निवडणुकीतील उत्साह कायम आहे. त्यामुळे गाव नेते या निवडणुकाच्या तापलेल्या ताव्यावर आपली पोळी भाजत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील गटागटाच्या राजकारणावर अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)
पावसाअभावी शेतकरी हताश, गावपुढारी मात्र जोमात
By admin | Updated: July 30, 2015 01:07 IST