वरोरा : शहरात व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर अपुरे पाडण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागात ज्या व्यक्तींचा अहवाल सकारात्मक आला असेल त्यांच्यावर त्याच परिसरात उपचार होणे सुकर व्हावे, याकरिता ग्रामीण भागात कोविड सेंटरची तातडीने उभारणी करण्याचे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी दिले.
वरोरा शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. शहरातील शासकीय वसतिगृह, ट्रामा केअर युनिट तसेच माता महाकाली पॉलिटेक्निकमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्ण या सेंटरमध्ये दाखल होत असल्याने रुग्ण संख्या अधिक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्याकरिता वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात खा. बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आ. प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात वरोरा तालुक्यातील माढेळी, शेगाव येथे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. सेंटरमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व त्यांना सहकार्य करण्याकरिता वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केली जाणार आहे. याकरिता त्या परिसरातील शाळा रुग्णालयाच्या इमारती पाहणी करण्यात येणार असून सेंटरमध्ये जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याच धर्तीवर भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात सेंटर उभारले जाणार आहेत. कोविडसंदर्भात कोणत्याही साहित्य व मदतीला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी खा. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर यांनी दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे, संवर्ग विकास अधिकारी संजय वानखेडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळ मुंजनकर, इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, माढेळी सरपंच देवानंद महाजन, निलजईचे सरपंच निखिल हिवरकर आदी उपस्थित होते.