चंद्रपूर : इंग्रजी माध्यमाच्या शाळेची शासनाकडून मान्यता घेऊन प्रत्यक्षात हिंदी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रताप येथील वर्धा व्हॅली इंग्रजी मिडीयम स्कूलने केला आहे. शिक्षण विभागाच्या तपासणीत हा प्रकार उजेडात आल्यानंतर सावरासावर करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आरटीई अँक्टनूसार शाळेत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे शाळा व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहेत.जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात खासगी कायम विनाअनुदानित तत्तावर शाळा आहे. यातील काही शाळांमध्ये नियमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात येत नसल्याने त्यांची मान्यता आता धोक्यात आली आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. दोन दिवसापूर्वी मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील शाळेची शिक्षणविभागातील पथकाने तपासणी केली असता अनेक त्रुट्या आढळून आल्या. त्यानंतर या शाळेच्या अनुदानावर गडांतर आले आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी येथील वर्धा व्हॅली इंग्रजी मिडीयम स्कूलमध्ये शिक्षणविभागाच्या पथकाने तपासणी केली. यापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये या शाळेने शासनाकडून इंग्रजी माध्यमाची मान्यता मिळविली होती. मात्र प्रत्यक्षात हिंदी माध्यमातून शिकविण्यात येत होते. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून बिनधास्तपणे सुरु होता. आता मात्र शिक्षणविभागाने यावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे या शाळेने मागील वर्षापासून इंग्रजी माध्यमातून शिकविणे सुरु केले आहे.शनिवारी पथकाने शाळेची तपासणी केली असता काही त्रुट्या आढळून आल्या. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन पाळीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत असले वेगवेगळे मुख्याध्यापक तथा शिक्षक नसल्याचे यावेळी आढळून आले. शाळा इमारतीला मागील अनेक वर्षांपासून रंग मारण्यात आला नाही. त्यामुळे शाळा परिसरात आनंददायी वातावरण नाही. एवढेच नाही तर, अंपग विद्यार्थ्यांना शाळेत येताना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक शाळांनी रॅप बनवावा, असे शासनाचे निर्देश आहे. मात्र या शाळेने अद्यापही रॅप बनविला नसल्याचे पथकाला आढळून आले. शाळेतील त्रुट्या पूर्ण न केल्यास भविष्यात शाळेच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. तपासणी पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे, उपशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी, शिक्षक तज्ज्ञ कोवलती आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
मान्यता इंग्रजी शाळेची, शिक्षण हिंदी माध्यमातून
By admin | Updated: May 31, 2014 23:22 IST