चंद्रपूर : पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात आवश्यक पौष्टिक भाज्या या नागरिकांच्या पोटात जात असत. परंतु या काही वर्षात तणनाशकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे तणासह या राजभाज्याही मिळेनाश्या झाल्या आहेत. यातील काही भाज्या तर आता नामशेषही होत आहेत. पावसाळ्याला सुरूवात होताच, शेताच्या बांधावर तरोटा, आंबतचुका घोळ आदी रानभाज्या उगवायला सुरुवात व्हायची. पूर्वी याचे प्रमाण अधिक होते. कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात या काळात रानभाज्यांचे प्रमाण हे पूर्वी अधिक असायचे. परंतु गेल्या दशकात शेती करणाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाले. शेतीच्या गरजा वाढल्या. पिकात झालेले तण निंदण्यासाठी मजुरांची गरज असते. परंतु दिवसेंदिवस मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे तणनाशकाचा वापर या काही वर्षात वाढला. या तणनाशकाचा विपरित परिणाम या रानभाज्यांवर होऊन शेतात उगवणाऱ्या चवळी, करडकोसला, अंबाडी, तरोटा, काटोले, वाघाटे, आंबडचुका आदी रानभाज्या नामशेष होत आहे. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळेही अनेक जुने गावरान वाणही नष्ट होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवणाऱ्या तरोट्याची जागा मागील १० ते १५ वर्षात गाजर गवताने घेतली असल्याचे दिसते. तणनाशकाच्या वापराने दुष्परिणाम समोर येत असले दुसरा पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे निरनिराळ्या रानभाज्याची चव आज विस्मृतीत चालली आहे. दशकभरापूर्वी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे या रानभाज्यांना खूप महत्त्व होते. ग्रामीण भागात आजही या भाज्यांची उणिव जाणवते या काही वर्षात सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे बारमाही हिरवा भाजीपाला मिळतो. पण त्यात रानभाज्या नसतात. परिणामी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्या नागरिकांना दुसरा कुठलाही पर्याय नसतो. तसेच नव्या पिढीपर्यंत यातील किती भाज्या शिल्लक राहील या प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)
तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्यांमध्ये घट
By admin | Updated: November 2, 2015 00:59 IST