जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून सिंचाई विभागामार्फत सिमेंट प्लग बंधारे बांधकाम कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात ९00 बंधार्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी ८२0 बंधारे पूर्ण झाले असून ८0 बंधार्यांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ३५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. ८0 बंधार्यांच्या बांधकामासाठी निधी अपुरा पडला असल्याने पुढील बांधकाम रखडले आहे. मात्र या बंधार्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट आहे. शिवाय पाण्याविना हे बंधारे कोरडे पडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ८१८ गावात सिमेंट प्लॅग हे बंधारे नाल्यावर बांधण्यात आले आहेत. या बंधार्याचे बांधकाम जि.प. अंतर्गत सिंचाई विभागामार्फत करण्यात आले. त्यामुळे यावर जि.प. च्या पदाधिकारी व सदस्यांचे पूर्ण वर्चस्व होते. त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना बांधकाम सोपविण्यात आले. एक बंधारा पाच ते सात लाख रुपये किंमतीचा असून त्यासाठी निविदा न काढता परस्पर ग्रामपंचायतीकडे बांधकाम सोपविण्याचे नाटक करून बंधार्याचे बांधकाम राजकीय ठेकेदारांना सोपविण्यात आले. अनेक बंधारे नियमाला तिलांजली देऊन निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. यात राजकीय नेते व बांधकाम अभियंत्याचे साटेलोटे जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. या बंधार्याच्या बांधकामात उर्वरित रकमेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जि.प. सदस्य व अभियंत्यांनी हात धुतल्याची माहिती आहे. बांधण्यात आलेल्या बंधार्याच्या पाण्याने ४९३0.२२ हेक्टर शेती सिंचन करण्याचा उद्देश होता. यात ११.६८ दलघमी पाणीसाठा होत असल्याचा देखावा सिंचाई अभियंते करीत आहेत. मात्र प्रत्यक्ष बंधार्याची अवस्था बघितल्यास अनेक बंधारे पाण्याविना कोरडेच आहेत. अनेक बंधार्यांना पाट्या लावण्यात आल्या नाहीत. जादा मलिंदा लाटण्याच्या नादात निकृष्ट, दर्जाहिन बंधार्याचे बांधकाम करण्यात आले. बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य अंदाजपत्रकाप्रमाणे नाही. तरीही गुण नियंत्रकाकडून योग्य साहित्य, मसाला वापरल्याचे प्रमाणपत्र घेण्याची तजवीजही करण्यात आली. सर्व ‘मॅनेज’ पद्धतीने बांधलेले बंधारे योग्य व उत्तम दर्जाचे असतीलच याबाबत जनतेत शंका- कुशंकाना पेव फुटला आहे.