कापूस पीक डिसेंबरअखेर शेतातून काढून टाकावे व फरदड घेऊ नये. डिसेंबर महिन्यानंतर ५ ते ६ महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्टात येते. त्यामुळे हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यात खाद्य नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. हंगाम संपल्यावर शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत, हा उपायही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी सुचिवला आहे.
कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करून बांधावर ठेवू नये. कापूस पिकाचा चुरा करणाऱ्या यंत्राचा (श्रेडर) वापर करावा. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न घडलेली कीडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनिंग-प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.