चंद्रपूर : कोविडग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ऑक्सिजन उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
एमआयडीसी परिसरातील आदित्य ऑक्सिजन प्लांटची शुक्रवारी पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, तहसीलदार नीलेश गौड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी ऑक्सिजन उत्पादन आणि वितरण कसे व कुठे होते, याबाबतीत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे पहिल्यांदा रुग्णांसाठीच पुरवठा करावा, ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवावी, उत्पादनासाठी काही अडचणी आल्यास त्या सोडविण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिले.