प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज
सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
गेली दोन वर्षे पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात शंभर टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राबविण्यात आला. त्यासाठी गावागावात जनजागृतीही करण्यात आली. जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हागणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
शासनाने अनेकवेळा ‘स्वच्छतेकडून सुरक्षिततेकडे’ असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. पण जी गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त झालेली आहेत, त्या गावातील परिस्थिती विदारक असून ‘हीच का ती स्वच्छ व हागणदारीमुक्त गावे?’ असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गावात शौचालय निर्माण झाले खरे, पण त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत नसून नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसते.
बॉक्स
अनेक गावात नावापुरतेच अभियान
अनेक गावांमध्ये केवळ नावापुरतेच अभियान राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावात प्रवेश करताक्षणीच अस्वच्छता पहावयास मिळत असून ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृतीची गरज आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.