वीज वितरण कंपनीच्या दादागिरीच्या विरोधात तीव्र असंतोष
भद्रावती : वीज वितरण कंपनीने कोरोनाकाळातील थकीत वीजबिलवसुलीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांमार्फत
दादागिरीने कित्येक नागरिकांचा वीजपुरवठा खंडित केला. तो पूर्ववत करण्यासाठी सोमवारी सहायक अभियंता भद्रावती यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, दोन दिवसांत वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत कोणत्याही प्रकारचा बदल घडून आला नसल्याने वंचित बहुजन आघाडी भद्रावतीतर्फे बुधवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्यात आला.
सध्याचे दिवस हे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवस आहेत. शालेय बोर्डाच्या व विद्यापीठाच्या परीक्षा या मार्च, एप्रिल व मे महिन्यांत शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे अगोदरच विद्यार्थी तणावग्रस्त आहे. यामध्ये त्यांच्या घरचा विद्युतपुरवठा खंडित केल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊन वर्षे वाया जाऊ शकते. त्याच प्रकारे मागील एका वर्षात कोरोनाच्या महामारीत मजूर, कामगार, शेतमजूर, लहान-मोठे व्यावसायिक व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वर्षभरात सहा महिने ते बेरोजगार होते. अशा परिस्थितीत त्यांच्या घरी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जाऊन गुंडगिरी प्रवृत्तीने त्यांच्या घरच्यांना अपमानित करून विद्युतपुरवठा खंडित करीत आहे. वीज वितरण कंपनीची ही दादागिरी थांबवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी भद्रावतीमार्फत वीज वितरण कंपनीला घेराव करण्यात आला.
भद्रावती शहर व तालुक्यातील कोणत्याही मजूर कामगार शेतमजूर लहान-मोठे व्यावसायिक व शेतकरी यांचा विद्युतपुरवठा खंडित करू नये. केल्यास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वतः वीजपुरवठा पूर्ववत करतील, असा इशारा वीज वितरण कंपनीला देण्यात आला.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम, तालुकाध्यक्ष विजय इंगोले, जिल्हा अध्यक्ष कविता गौरकर, तालुकाध्यक्ष महिला आघाडी भद्रावती संध्या पेटकर, नगरसेवक सुनील खोबरागडे, नगरसेवक सुशील देवगडे, कपूर दुपारे, मंगल कांबळे, दिलीप साव, लता टिपले, नगरसेविका राखी रामटेके, सीमा ढेंगळे, राहुल चौधरी, रूपचंद निमगडे, रजनी कराडे, मेघा डोंगरे, मनोरमा परचाके, रवीना ढाले, आम्रपाली गावंडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.