सास्ती : राजुरा ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे लक्कडकोटपर्यंत डांबरीकरण नुकतेच करण्यात आले. त्यामुळे बऱ्याच महिन्यानंतर वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. परंतु या महामार्गातील पारधीगुडा ते लक्कडकोटदरम्यान १०० मीटर अंतरात असलेले मोठमोठे खड्डे जीवघेणे ठरत आहेत.
या ठिकाणी डांबरीकरण किंवा दुरुस्ती करण्यात आली नसल्याने, या विभागाच्या कामाच्या पद्धतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विभागाचे अधिकारी यांना विचारले असता नेमके कारण न सांगता लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यालाही दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गातील कामात असे दुर्लक्ष होत असल्याने त्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जनतेत संताप व्यक्त होत असून त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.