आठवणी स्वातंत्र्याच्या जल्लोषाच्या: खादीच्या वस्त्राने प्रभावित झाले कॉलेज प्रशासनराजकुमार चुनारकर चिमूर महात्मा गांधीनी ग्वालीयर टँकवरुन ‘चले जाव’चा नारा दिला. या नाऱ्याने पूर्ण देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यामुळे भारतीयांनी अनेक आंदोलने करुन ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडले. अशातच इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला १५ आॅगस्ट १९४७ ला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे स्वातंत्र्यांचा जल्लोष पूर्ण भारतभर साजरा करण्यात येत होता. रायपूर येथील राजकुमार महाविद्यालयातही हा जल्लोष होता. या महाविद्यालयात स्वातंत्र उत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली. आता पहिले ध्वजारोहण कोण करणार, असा महाविद्यालयीन प्रशासनापुढे पेच होता. तेव्हा रुबाबदार व्यक्तिमत्व व खादीचे वस्त्र परिधान केलेल्या विद्यार्थ्याला ध्वजारोहण करण्याचा मान देण्याचे ठरले आणि चिमूरच्या १७ वर्षीय दामोधर लक्ष्मण काळे यांनीे राजकुमार महाविद्यालयात स्वातंत्र्यांचे पहिले ध्वजारोहण केले. ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिक म्हणून त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.भारतावर दीडशे वर्षे राज्य करताना इंग्रजांनी भारतीयावर अनेक अत्याचार केले असले तरी राज्यकारभार चालविण्यासाठी शिक्षणासह दळणवळणाच्या सुविधाही आणल्यात. इंग्रज राजवट असतानाच मुळचे सावली तालुक्यातील निफंद्रा (विहीरगाव) येथील मालगुजार असलेले लक्ष्मण काळे यांचे चिरंजीव दामोधर काळे यांनी अकरावीपर्यंत चंद्रपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेले. मात्र तिथे राहणे न जमल्याने रागाने परत येत रेल्वेस्टेशनवर आले. तिथे दामोधरची भेट नवाब पतोडी यांच्याशी झाली. त्यांनी दामोधर काळे यांना रायपूर येथील राजकुमार महाविद्यालयात हाऊ टू रुल ए नेशन या तीन वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळूवन दिला व रायपूर येथे दामोधरच्या शैक्षणिक जीवनास सुरुवात झाली.रायपूर येथील राजकुमार महाविद्यालयात शिक्षण घेत असताना देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा होणार होती.याची पुसटशी माहिती महाविद्यालयात आली. या महाविद्यालयात संस्थानिकांची १७० विद्यार्थी शिक्षण घेत होती. याच दरम्यान भारताला १५ आॅगस्ट १९४७ ला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र मिळाले. स्वातंत्र्याचा सोहळा सगळीकडे साजरा करण्यात येत होता. स्वातंत्र्यांचा सोहळा राजकुमार महाविद्यालय रायपूर येथे साजरा करण्यात आला. महाविद्यालयात स्वातंत्र्याची जय्यत तयारी करण्यात आली व महाविद्यालय प्रशासनाने स्वातंत्र दिनाच्या पहिल्या ध्वजारोहणाचा मान विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले. मात्र १७० विद्यार्थ्यामधून कुणाला निवडयाचे, असा पेच असताना सफेद खादीचे वस्त्र परिधान करुन असलेल्या रुबाबदार व्यक्तीमत्व असलेल्या चिमूरच्या दामोधर लक्ष्मण काळे यांना १५ आॅगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या ध्वजारोहणाचा मान मिळाला. हा मान दामोधरला खादी वस्त्र व रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे मिळाला. हा सर्व घटनाक्रम ‘लोकमत’जवळ कथन करताना ९४ वर्षीय दामोधर काळे गुरुजींचा यांचा उर भरुन आला होता.खादीला गतवैभव येईल काय?स्वातंत्र्यप्राप्ती अगोदरच्या काळात खादीचे वस्त्र हे गांधीजी वापरायचे. त्यामुळे या खादीला गांधी खादी म्हणून ओळखले जाते. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात खादीचे महत्व कमी झाले. फक्त खादी राजकीय पुढाऱ्यांपुरती मर्यादित राहिली. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हप्त्यातून एकदा खादीचे वस्त्र सर्व शासकीय अधिकाऱ्यांने वापरावे, असे निर्देश दिल्यामुळे आतातरी खादी वस्त्राला गत वैभव प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
चिमुरातील दामोधरने रायपुरात फडकविला स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा
By admin | Updated: August 15, 2016 00:25 IST