शहरातील बाबूपेठ, आंबेडकरनगर प्रभाग, हिंदुस्थान, लालपेठ, भिवापूर परिसराची लोकसंख्या ५० हजाराच्या जवळपास आहे. या परिसरात गोरगरीब व कामगार लोक वास्तव्यास आहेत. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची उपचारासाठी धावपळ होत आहे. बहुतांश रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाबूपेठ परिसरातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा बाबूपेठ येथील सुसज्ज इमारतीत कोरोना सेंटर सुरू केल्यास परिसरातील रुग्णांना सोईचे होईल. तसेच रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत कोविड सेंटर उभारण्यात यावे यासाठी बाबूपेठ येथील नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेविका पुष्पा मून, नगरसेविका ज्योती मून, नगरसेविका मंगला आखरे, नगरसेवक सतीश घोनमोडे, नगरसेविका ललिता रेवेल्लीवार आदींनी एकत्र येत आयुक्तांना निवेदन दिले.
बाबूपेठमध्ये कोविड सेंटरसाठी नगरसेवक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST