चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत तीन लाख ५७ हजार २६२ कोरोना तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून यात आर.टी.पी.सी.आर.च्या एक लाख ७७ हजार १४४, तर ॲन्टिजेनच्या एक लाख ८० हजार ११८ तपासण्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविले जात होते. तेथून अहवाल यायला वेळ लागत असल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याकरिता व्ही.आर.डी.एल. प्रयोगशाळा सुरू करण्यात येऊन येथे ४ जून २०२० पासून स्रावनमुने तपासणीचे आर.टी.पी.सी.आर. मशीन बसविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील व्ही.आर.डी.एल. प्रयोगशाळेत बसविण्यात आलेल्या या मशीनद्वारे आतापर्यंत एक लाख ५३ हजार ६२३ नमुने तपासण्यात आले आहेत.
मशीनची क्षमता सुरुवातीला प्रतिदिवस ३६० नमुने तपासणी करण्याची होती. ती पुढे ७२० व आता १२०० अशी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. यात अजून वाढ करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि साहित्य उपलब्ध करण्याचे काम प्रशासनातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या या मशीनची क्षमता १२०० असतानाही त्यावर सुमारे दोन ते अडीच हजार नमुने दररोज तपासण्यासाठी येत आहेत. या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम करून मशीनच्या क्षमतेपेक्षा दुपटीने नमुने दररोज तपासून रुग्णांना २४ तासांच्या आत चाचण्यांचे अहवाल उपलब्ध करून देत आहेत. मात्र चंद्रपूर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. चंद्रपूरपासून चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी हे तालुके १०० ते १५० कि.मी. अंतरावर असून लांब अंतरावर असल्याने नमुने संकलित करून तपासणीसाठी येईपर्यंत वेळ लागतो; त्यामुळे या नमुन्यांचे तसेच क्षमतेपेक्षा अधिक संकलित झालेल्या काही नमुन्यांचे रिपोर्ट संबंधितांना मिळायला काही वेळा ३६ तासांचा अवधी लागतो. यासाठी मशीनची क्षमतावाढ व त्या प्रमाणात तंत्रज्ञ वाढविणे अत्यावश्यक आहे.
बॉक्स
दुसऱ्या लाटेत चाचण्या वाढविल्या
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी दररोज साधारणत: ५०० पर्यंत होणाऱ्या तपासण्यांमध्ये आता चार हजार ५०० पर्यंत वाढ झाली आहे. सध्या ॲन्टिजेनच्या सुमारे २३०० ते २५००, तर आर.टी.पी.सी.आर.च्या सुमारे २००० ते २५०० तपासण्या रोज करण्यात येत आहेत. या कठीण प्रसंगात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्याकडून वेळोवेळी प्रयोगशाळेला सहकार्य केले जात असल्याचे सध्याचे प्रयोगशाळा प्रभारी डॉ. भाऊसाहेब मुंडे यांनी सांगितले.