पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामपंचायत विहिरगाव गावात एक युवकाचा कोरोनामुळे घरीच मृत्यू झाला. ही माहिती गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, संगणक परिचालक यांना देण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून त्या युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
तीन दिवसांपूर्वी वडिलांचा आणि आज मुलाचा मृत्यू झाल्यामुळे गावात खळबळ उडाली. सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू असून, जनता कर्फ्यू सुरू असल्याने गावात शुकशुकाट आहे. युवकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावातील लोक आणि नातेवाईकही तयार नसल्याने अंत्यसंस्कार करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर सामाजिक दायित्व स्वीकारून विहीरगाव येथील सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत सदर युवकावर अंत्यसंस्कार केला. यावेळी सरपंच कविता मुंढरे, ग्रामसेवक नैताम, संगणक परिचालक प्रवीण मुंढरे व त्याचे ग्रा.पं. कर्मचारी कैलास ठवरे व पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.