फोटो : सिलिंडर देताना कार्यकर्ते
चिमूर : चिमूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, सोबतच मृत्यूची संख्याही वेगाने वाढत असताना मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने चिमूरला सापत्न वागणूक मिळत आहे. ऑक्सिजनअभावी मृत्युदर आटोक्यात येत नसल्याने आमदार बंटी भांगडिया यांच्यातर्फे स्वनिधीतून चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केअर सेंटरला शनिवारी तत्काळ १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात आली.
त्यामुळे चिमूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून काही रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या घटनासुद्धा समोर येत आहेत. त्यातच, चिमूर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व वाढता मृत्युदर, त्यात जिल्हा प्रशासन यांच्याकडे मागणी करूनही विलंब आणि त्यातही कमी पुरवठा होत आहे. हे लक्षात आल्याने तसेच चिमूर भागातील पेशंट चंद्रपूर येथे दाखल न करता बेड व ऑक्सिजनअभावी ताटकळत ठेवल्याने रुग्णांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
दरम्यान, चिमूर येथील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र कुठेही न पाठवता येथेच उपचार घेता यावा व रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडून १० ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर कार्यकर्त्यांमार्फत शनिवारी चिमूर येथील कोविड केंद्रास देण्यात आले. नागरिकांनीसुद्धा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन आ. भांगडिया यांनी केले आहे. उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गो.वा. भगत यांना हे सर्व जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द करण्यात आले.
यावेळी भाजप ज्येष्ठ नेते राजूभाऊ देवतळे, एकनाथ थुटे, समीर राचलवार, टीमू बलदुवा, विक्की कोरेकार आदी उपस्थित होते.