चंद्रपूर : येथील इरई नदीवरील दाताळा पूल बांधून तयार झाला आहे. सी-लिंकच्या धर्तीवर असलेल्या या पुलाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जात आहे. दरम्यान, पादचाऱ्यांसाठी तसेच वाहनांसाठी वेगवेगळे रस्ते आहे. मात्र काही अतिहौशी नागरिक पुलाच्यामध्ये सेल्फी काढत आहे. बऱ्याचवेळा रात्रीच्या वेळीसुद्धा येथे गर्दी होत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता असून संबंधितांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
भाजी बाजारसाठी जागा द्यावी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये गोल बाजार, गंजवाड तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाजीबाजार भरतो. मात्र वडगाव परिसरातील नागरिकांना भाजी घेण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या परिसरात भाजीबाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, येथे ग्रामीण भागातील शेतकरी येतात. मात्र त्यांना विक्रीसाठी जागाच नसल्याने इतरत्र भटकावे लागते.
चिल्लरवर चाॅकलेटचा पर्याय
चंद्रपूर : शहरातील बहुतांश किराणा तसेच अन्य छोटे व्यावसायिक सुटे पैसे न देता ग्राहकांच्या हातात चाॅकलेट देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नको असतानाही नाईलाजाने चाॅकलेट घेऊन जावे लागत आहे. ग्राहकांनी चाॅकलेट घेण्यास नकार दिल्यास चिल्लर नसल्याचे कारण सांगून अनेकवेळा ग्राहकांना अडविले जात आहे.
वाघ दर्शनासाठी रात्रीचा प्रवास
चंद्रपूर : हमखास वाघ दर्शनासाठी येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येतात. मात्र काही स्थानिक हौशी नागरिक रात्रीच्या वेळी मोहुर्ली, लोहारा, मूल मार्गे फिरून आपली हौस भागवीत आहेत. मात्र यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने या मार्गावर रात्रीच्या सुमारास गस्त घालावी, अशी मागणी पर्यटनप्रेमींकडून केली जात आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
रोहयो कामांची संख्या वाढवावी
भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक जाॅबकार्डधारकांना कामे मिळत नाहीत. सध्या शेतीपासून पुरेसा रोजगार नाही. त्यामुळे रोहयो कामांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.
ग्राम राजस्व अभियान सुरू करावे
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण आता कमी होत असल्याने जिल्ह्यात ग्राम स्वराज्य अभियानाची गरज आहे. या अभियानामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळते. ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाने तहसील व पंचायत समितीकडून अभियान सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा
राजुरा: वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील दुर्गम गावांंमध्ये वीज बंद राहत असल्याने कृषिपंपांवर अनिष्ट परिणाम झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बिल भरले नाही. वीज वितरण कंपनीने बिल दुरुस्ती मोहीम सुरू केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार बंद झाले नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
बँकेसाठी नवी इमारती उभारावी
चंद्रपूर : दुर्गापूर येथील अलाहाबाद बँकेत दरवर्षी खातेदारकांची संख्या वाढतच आहे. मात्र, जुन्या इमारतीतील अपुऱ्या जागेमुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे.
बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे
चंद्रपूर : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएल धारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुंबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिक विकासापासून वंचित आहेत.
अंचलेश्वर बस नियमित सोडण्याची मागणी
चंद्रपूर : येथून अंचलेश्वर गेट ते बल्लारपूरपर्यंत जाणाऱ्या बसेस वेळेवर जात नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शाळा सुरु असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
मिलन चौकात सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील मिलन चौकात सिग्नल सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे महानगरपालिका व वाहतूक विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. काही दिवसापूर्वी शहरातील इतर चौकामध्ये सिग्नल सुरू करण्यात आले. मात्र येथील सिग्नल सुरु करण्यात आले नसल्याने या चौकात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
शेतीपूरक योजना गावात पोहोचवा
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. परंतु, यंदा अती पाऊस पडल्याने अनेकांची पिके वाया गेली. लागवडीचा खर्च निघाला नाही. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत. त्यामुळे दुग्ध व शेतीपूरक अन्य योजना आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अल्प उत्पादनामुळे आर्थिक कोंडी
चिमूर : तालुक्यात धानाची शेती केली जाते. परंतु, यंदा खरीप हंगामातील पिके वाया गेली. रबी हंगामातील पिकांचेही स्थिती समाधानकारक नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून यंदा शेती केली. उत्पन्नात घट झाल्याने कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न विचारला जात आहे. अवकाळी पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केले. पण, मदत मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे.
नवतळा मार्गाची दुरवस्था
चिमूर : तालुक्यातील जांभूळघाट-पिंपळगाव-नवतळा या आठ किमी अंतराच्या मार्गाची पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडले. मोठे खड्डे पडले. या मार्गावरुन प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.