चंद्रपूर : शेती क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान आले आहे. यंत्राच्या सहाय्याने काही शेतकरी शेती करीत असले तरी आजही शेतीमध्ये बैलांना मोलाचे स्थान आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पशुधन घटल्यामुळे बैलजोडी घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्या बैलजोडी घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. त्यातच त्यांना सांभाळण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
लाॅकडाऊनंतर जिल्ह्यातील बैलबाजार सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, गडचांदूर, नागभीड, ब्रह्मपुरी या ठिकाणी आठवडी बैलबाजार भरतो. एका बाजारामध्ये साधारणत: २०० ते २५० बैलजोड्या विक्रीला येत आहेत. मात्र, वाढलेली किंमत ऐकून अनेकजण माघारी जात आहेत. विशेष म्हणजे, सरासरी ५० ते ६० जोड्यांचे फेरबदल होत आहेत. सध्या बैल खरेदी करणे परवडण्यासारखे नाही. ज्यावर्षी उत्पन्न चांगले त्यावर्षी बैलबाजार तेजीत असतो. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने पाहिजे तशी तेजी नसल्याचे शेतकऱ्यांसह बैलविक्री करणाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दुधाळ जनावरांचीही मागणी वाढली आहे. शहराशेजारी असलेल्या गावांमध्ये दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यामुळे या गावांमध्ये गाय, म्हैस खरेदी - विक्रीमध्ये चांगलीच तेजी आहे. साधारणत: ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत गाय, म्हैस मिळत आहे. यातही काहींच्या किमती अधिक आहेत.
मागील काही वर्षांमध्ये शेतकरी पशुधन कमी करण्याकडे वळले आहेत. यामध्ये चारा, पाणी तसेच सांभाळणे कठीण होत असल्याने आपल्या जवळील पशुधन विक्री करीत आहेत.
--
दुधाळ जनावरांची मागणी
१) शहराशेजारी असलेल्या गावांमध्ये दुधाळ जनावरांची खरेदी - विक्री केली जाते. अनेक तरुण या कामात गुंतले आहेत.
२) दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी दूध देणारी जनावरे गरजेची असतात. अशावेळी जास्त भाव देऊन ते जनावरांची खरेदी करीत आहेत.
३) म्हैस खरेदी करण्याकडे शेतकरी तसेच दूध व्यवसाय करणाऱ्यांचा अधिक भर आहे. विशेष म्हणजे, म्हशीच्या किमतीही आवाक्याबाहेर आहेत.
४) जनावरे सांभाळणे कठीण होत असल्यामुळे कमी पशुधनामध्ये शेतीची कामे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी गावठीपेक्षा संकरीत गाय खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे.
-
बैलजोडीला दिवसाचा खर्च ४०० रुपयांपर्यंत
बैलजोडी खरेदी करणे जसे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे तसेच त्यांचा सांभाळ करणेही कठीण आहे. वर्षाला हजारो रुपये यासाठी खर्च करावे लागत आहे. बैलांना कडबा, कुटार, ढेप या खर्चाव्यतिरिक्त त्यांची देखभाल, राखण करण्यासाठी मजुरांनाही मजुरी द्यावी लागते. एवढेच नाही तर औषधोपचारावरही खर्च होतो.
-
२० ते ३० लाखांची उलाढाल
लाॅकडाऊननंतर आता बैलबाजार हळूहळू सुरू होत आहे. दरम्यान, शेतीचे कामेही आता काही प्रमाणात कमी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी बैल विक्री करीत आहेत. आठवडी बाजारात सरासरी २० ते ३० लाख रुपयांची उलाढाल होत आहे. काही शेतकरी बैलजोडी खरेदी न करता दोन बैलांपैकी एखादा वृद्ध किंवा इतर आजारी असेल तर त्याला विकून दुसऱ्याला जोड लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधाळ जनावरांचा बाजार भरतो. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी गर्दी करीत आहेत. या बाजारातही १० ते २० लाखांची उलाढाल होते.
--
कोट
जनावरे सांभाळणे कठीण
मागील काही वर्षांमध्ये शेती व्यवसायामध्ये मोठे नुकसान होत आहे. लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे पशुधन ठेवणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परिणामी शेतकरी पशुधन विक्री करीत आहेत.
-विनोद परसुटकर
शेतकरी, गोवरी
---
बैलजोडीच्या किमती लाखांवर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. नाईलाजाने बैल खरेदी करावे लागत आहेत. अनेकवेळा बैलजोडी खरेदी न करता बैल बदलण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
- गजानन रणदिवे
नागभीड
---
उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी काहीशी अवस्था शेतीची झाली आहे. त्यातच भाव वाढीमुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेतकरी तडजोड करून शेती करीत आहेत. यामुळे बैलजोड्यांची संख्या कमी होत आहे.
- राकेश दिलीप वांढरे
शेतकरी, पळसगाव