कोळसा खाणींनी प्रदूषणात वाढ : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सुटलेप्रकाश काळे गोवरीकोळसा खाणींचे दिवसेंदिवस वाढत चाललेले जाळे आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसविल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्यांच्यावर प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी दिली, त्यांचेच कर्तव्यात कसूर होत असल्याने प्रदूषणाचा भस्मासूर राजुरा तालुक्याच्या जीवावर उठला आहे.राजुरा तालुक्याला काळ्या सोन्याची देण आहे. मुबलक प्रमाणात दगडी कोळश्याचे साठे तालुक्यात असल्याने राजुरा तालुक्यात खुल्या व भूमिगत कोळसा खाणींची संख्या मोठी आहे. नव्या कोळसा खाणींचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. कोळसा खाणीत होणाऱ्या शक्तीशाली बॉस्टिंगने मानसाचे आयुष्यच हादरले आहे. उद्योगांमुळे धुळ प्रदूषण होणे स्वाभाविक आहे. यासाठी उद्योगांनी कायदा न मोडता नियंमाचे तंतोतत पालन करणे आवश्यक असते. धुळ प्रदूषणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यान्वीत आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी नियमावली उद्योगांकडे आहे. परंतु, प्रदूषण नियंत्रणात आणणार कोण, असा प्रश्न सध्याच्या परिस्थीवरून दिसून येत आहे. एखाद्या वेळेस प्रदूषण नियंत्रण पथक तपासणीसाठी कोळसा खाणीत किंवा एखाद्या उद्योगाकडे गेले तर आमच्या कारखाण्यात धूळ प्रदूषण नाही, असा आव आणला जातो. प्रदूषण नियंत्रणाचे कागदी घोडे कागदावरच रंगविले जातात. नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केला जात असेल तर सामान्य जनतेनी प्रदूषण नियंत्रणाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी एकट्या विभागावर ढकलून चालणार नाही तर उद्योगात धूळप्रदूषण होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी प्रत्येकांनी घेतली पाहिजे. गोवरी, पोवन, सास्ती, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीतील धुळीने परिसरातील नागरिकांचे आयुष्यच काळवंडले आहे. शेतपिकांवर उडणाऱ्या धुळीने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे परिसरातील जनतेला श्वसनाचे आजार जडण्याची भिती आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील या मंडळाला आपले कर्तव्य चोख बजावावे लागणार आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. धूळ प्रदूषण ही आता सर्व सामान्य जनतेची मुख्य समस्या झाली आहे. यावर आता उपाययोजना करणे गरजेचे आहे असून एक दिवस तालुक्यातील शेकडो नागरिकांना जीवाला मुकावे लागेल.धूळप्रदूषणावर बसायला हवा चाप धूळ प्रदूषणामुळे अनेकांचे आयुष्य काळवंडत चालले आहे. बहुतांश नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचे आजार जडले आहे. मोकळा श्वास घेण्याची संधी, गमावण्याची वेळ आली आहे. धुळीने चेहरा दुप्पट्याने झाकल्याशिवाय कुठेच बाहेर पडता येत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.
राजुरा तालुक्याला गिळतोय प्रदूषणाचा भस्मासूर
By admin | Updated: February 11, 2016 01:19 IST