जयंत जेनेकर
कोरपना : तालुक्यातील पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या कारवा (सांगोडा) येथील गावच्या पूर्व भागात अनादी काळापासून ऐतिहासिक गुंफा आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही या गुंफेकडे संशोधनाच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे.
अतिशय निसर्गरम्य असलेल्या एका ओढ्यात विशाल आकाराच्या पाषाणात या तीन गुंफा आहेत. यातील काही अपूर्ण आहेत. या भागात पावसाळ्यात पाणी भरलेले असते. तसेच हा भाग उंच असल्याने याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त होते. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हा परिसर परिपूर्ण आहे. अनेक वनस्पती या स्थानी असल्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसून येते. याच गुंफेच्या पूर्वेकडील बाजूला गुरगाव (बंडा) नावाचे गाव होते. आजचे रिठ स्वरूपात उरलेले आहे. तर उत्तरेस कारवा नावाच्या रिठावर जुने हनुमान मंदिर आहे. या भागातही पुरातन काळात वस्ती होती, असे जुणीजाणती मंडळी सांगतात. मंदिर परिसरात अनेक पुरातन देवतांच्या मूर्ती आढळून येतात. त्यामुळे पुरातत्व विभागाने या भागात संशोधन व संवर्धन करून हा गौरवशाली वारसा जपला जाणे गरजेचे आहे. तसेच हनुमान मंदिराला तीर्थक्षेत्र व गुफेला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
कोट
इसवी सनपूर्व काळात हिनयान पंथियांनी ध्यानधारणा किंवा वास्तव्यासाठी या गुंफांची निर्मिती केली असावी, असे या गुंफाच्या अवलोकनातून दिसून येते. जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून या गुंफाचे संवर्धन होणे भावी पिढीला इतिहास कळण्यासाठी गरजेचे आहे.
- सुरेश चोपणे,
अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर