नागभीड : सध्या कोरोनाचे चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे. सख्खे नातेवाईक ओळख द्यायला विसरले आहेत. अशावेळी त्याची ‘तो’ करीत असलेली मदत अनेकांना आधार ठरत आहे.
अमोल मुरलीधर वानखेडे असे त्या मदतकर्त्याचे नाव आहे. कोरोना काळात त्याने किमान ५० कोरोनाग्रस्तांना विविध प्रकारची मदत केली आहे. कोणाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तर कोणाला विविध रुग्णालयांशी संपर्क करून बेड मिळवून देण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे, तर काहींना शक्य असेल तेवढी औषधांसाठी मदत केली आहे.
एवढेच नाही तर आता अमोलने कोरोना पाॅझिटिव्ह व अलगीकरणात असलेल्यांना घरपोहोच जेवणाचा डबा पोहोच करण्याचे कामही सुरू केले आहे. जे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना जेवणाच्या डब्याचे पैसे संबंधित खानावळ चालकास देण्याची विनंती करतात. मात्र, जे खरोखरच आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशांना कोणतेही मूल्य न घेता ही सेवा देत आहेत. त्यामुळे परिसरातील कोरोनाबाधिताला आधार मिळाला आहे.