नागरिकांच्या आरोग्याला धोका : आरोग्य विभागाच्या अहवालातील वास्तवमंगेश भांडेकर चंद्रपूरपिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून पाणी पुरवठा करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी हे जीवन आहे. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण केंद्रासाठी शासनाने निधीही दिला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाणी नमूने तपासणीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी पाणी नमून्यांची तपासणी केली जाते. यात दूषित पाणी नमूने आढळलेल्या ग्रामपंचायतींना कळविले जाते. मात्र अनेक ग्रामपंचायती यानंतरही पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती अनियमीत पाणी शुद्धीकरण करीत असल्याचे म्हटले आहे. यात सर्वाधिक ग्रामपंचायती नागभीड तालुक्यातील आहेत. तर घुग्घुस, दुर्गापूर, पोंभुर्णा या मोठ्या ग्रामपंचायतीही गावाला पुरवठा करणाऱ्या पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे म्हटले आहे. दूषित पाणी पिल्याने विविध आजाराची लागण होत असते. असे प्रकार यापूर्वी अनेक गावात घडले आहेत. अनेकदा नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात नारू आढळल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र तरीही पाण्याचे नियमीत निर्जतुंकीरण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष पसरला आहे.
९१ ग्रामपंचायतींकडून अनियमित जलशुद्धीकरण
By admin | Updated: December 23, 2015 01:07 IST